गर्भाचे आवडी मातेचा डोहळा...




Print This!

बाळ गर्भात असताना, त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अन्नघटक त्याला मातेच्या रक्तप्रवाहातील पोषक तत्वांतून मिळत असतात. ही पोषक तत्वे मातेच्या अन्नपचनाच्या प्रक्रियेद्वारे रक्तप्रवाहात शोषली जातात व तेथून ती गर्भवेष्ट्ण अथवा वारेपर्यंत [Placenta) बाळासाठी पोहोचवली जातात. म्हणुनच बाळाच्या योग्य वाढीसाठी व विकासासाठी मातेने आपल्या आहाराची योग्य ती काळजी घेणं खूप आवश्यक आहे.

शरीराच्या सर्व भागंतील पेशी [cells] बनविण्याचे काम प्रथिने [proteins] करतात. अन्नपचनाच्या वेळेस ही प्रथिने अमीनो अॅसिड मध्ये परिवर्तीत होतात व स्नायू, त्वचा , रक्त यांसारख्या घटकांमध्ये पेशींचे जाळे निर्माण करतात. तसेच प्रसूतिनंतर बाळाला दूध पाजता यावे यासाठी मातेच्या स्तनग्रंथी विकसित करण्यातही प्रथिनांचा मोठा वाटा असतो.

प्राणिजन्य पदार्थ जसे दूध, अंडी. मांस, मासे यांत प्रथिने विपुल प्रमाणात असतात. ज्या माता केवळ शाकाहाराचे सेवन करतात किंवा ज्यांना वरचेवर मांसाहार करणे शक्य नसते अशा मातांनी डाळी, काळा व हिरवा हरभरा, घेवडा, वाटाणे यांसारख्या भाज्यांचे अवश्य सेवन करावे कारण यातही प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते. तसेच, कठीण कवचाची फळे उदा. अक्रोड यांमध्येही प्रथिने असतात.

गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी उर्जा पुरविण्याचं काम कर्बोदके करतात. साखर, पिष्टमय पदार्थ उदा. तांदूळ किंवा तत्सम धान्य, बटाटे व टॅपिओक हे कर्बोदकांचा खजिना असलेले अन्नपदार्थ आहेत.

बाळाच्या शरिरातील पेशी व चलन वलन नियंत्रकातील महत्त्वाचा घटक म्हणजे खनिजे. शरिरतील हाडे बनण्यासाठी अत्यावश्यक असलेले कॅल्शियम व फॉस्फोरस विसरून चालणार नाही. कॅल्शियम व फॉस्फोरसाची कमतरता असल्यास नवजात बाळाला 'मुडदूस' नावाचा रोग होण्याची शक्यता असते. दूध व दुग्धजन्य पदार्थ, गहू व नाचणी यांसारखी धान्ये व हिरव्या भाज्या यांचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो.



मातेच्या व गर्भातील शिशूच्या शरिरातील हिमोग्लोबिनचे संतुलन राखण्याचे काम लोह करते. अनिमिया व त्यामुळे शरीरात जाणवणारा अशक्तपणा, कोणत्याही गोष्टीत उत्साह न वाटणे ही लोहाच्या कमतरतेची उदाहरणे आहेत. शरीराला लोहाचा पुरवठा होण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, अंडी, गूळ, तॄणधान्य रोजच्या आहारात अवश्य समाविष्ट करावीत.


शरीरातील थायरॉइड गंथींमधून होणार्‍या स्त्रावाचे संतुलन राखण्याचे काम असते आयोडीनचे. हिरव्या भाज्या, धान्ये आणि काही समुद्री खाद्य यामध्ये आयोडीनचा साठा असतो.

शरीराच्या वाढीसाठी जीवनसत्वांना विसरून कसे चालेल? दातांच्या व हाडांच्या सुयोग्य वाढीसोबतच, दिसण्याची व मंद प्रकाशातही पाहण्याची क्षमता देणारे 'अ' जीवनसत्व हे हिरव्या भाज्या, पालेभाज्या, आंबा आणि गाजर असे पदार्थ खाल्ल्यास शरीराला पुरवले जाते. पेशींच्या कार्यशीलतेसाठी अत्यावश्यक असलेले 'क' जीवन्सत्व पुरविणारे पदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या, आवळा, पेरू, लिंबू, संत्री, मातेने पुरेसे सेवन केल्यास 'स्कर्व्हि' सारख्या रोगाला आळा बसतो. तसेच, मातेने सेवन केलेल्या आहारातील कॅल्शियम व फॉस्फोरस आणि त्यांचा मातेच्या शरीरातील वापर याच्याशी संबंधित असणारे 'ड' जीवनसत्व; याचा परिणाम बाळाच्या हाडांच्या व दातांच्या वाढीवर दिसून येतो.

पेशींच्या प्राणवायूशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत 'ब 2' जीवनसत्व(रिबोफ्लॅविन)चा मोठा हातभार असतो, शरिराची वाढ होण्याच्या कामी याची मदत होते. शरीराच्या संतुलित हालचाली व सामान्य रीतीने काम करण्यासाठी 'ब 1' जीवनसत्व (थायमिन)आवश्यक असते. तर, पेलाग्रा सारख्या घातक रोगाला 'ब 3' जीवनसत्व (नायासीन) अटकाव करते. शरीरात रक्त बनण्याच्या प्रक्रियेमधील महत्वाचे काम फोलिक अॅसिड करते. तसेच, शरीराला आवश्यक असलेल्या पोषणतत्वांचा पुरवठा 'ब6' व 'ब12' या जीवनसत्वांद्वारेही होतो. दही, अंडी, मासे, गाजर, लसूण, पाव, धान्य, हिरव्या पालेभाज्या या सर्व अन्नपदार्थांमधून आपल्याला ही जीवनसत्वे मिळत असतात. मात्र पदार्थ शिजविण्याच्या प्रक्रियेमधे काही जीवनसत्वांचा नाश होतो. यासाठी जमल्यास भाज्या कच्च्या खाव्या.

लेट्यूसची पाने, कोबी, गाईचे दूध, सफरचंद या अन्नामधून शरीराला मिळणारे जीवन्सत्व आहे 'के' आणि रक्ताला दाटपणा यावा म्हणून 'के' जीवनसत्वाची मदत होते.

आजच्या युगात पुरुषांच्या जोडीने स्त्रीयांचे धूम्रपान व मद्यपान करणे गैर मानले जात नाही. मात्र, सुखरूप प्रसूति व निरोगी बाळासाठी मातेने या दोन गोष्टी पूर्णपणे टाळल्यास उत्तम. तसेच पुरुषांनीही गर्भवती स्त्रीच्या समोर धूम्रपान करणे टाळावे.

बाळाची चाहूल लागताच मातेसोबत, कुटुंबियांचा आनंदही गगनात मावेनासा होतो. मातेने आहाराची थोडीशी काळजी घेतली, तर जन्माला येणार्‍या गुटगुटीत आणि निरोगी बाळाला पाहून हा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.

टीप: वरील माहिती ECCE च्या प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.

0 Comments:

  © Blogger template ProBlogger Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP